मुंबई – लोकसेवा आयोगातर्फे होणाऱ्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धत 2023 ऐवजी 2025 पासून लागू करावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी काल राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली..तब्बल १८ तासानंतर पुण्यातील विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर पुण्यातील अलका चौक येथील विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केल्याचे समजते.
पुण्यासह औरंगाबाद, नागपूर आदी ठिकाणी उमेदवारांनी आंदोलन केले. पुण्यातील आंदोलन रात्री उशीरपर्यंत सुरू होते. या आंदोलनास महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसने पाठिंबा दिला होता. मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भेट होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत होणाऱ्या भेटीकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.
विद्यार्थ्यांच्या नेमक्या मागण्या काय
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवेसाठी वर्णनात्मक परीक्षेचे स्वरूप स्वीकारले आहे. एमपीएससीच्या या निर्णयाचे उमेदवारांकडून स्वागत होत आहे. मात्र ही पद्धत 2025 पासून लागू करावी. म्हणजे आम्हाला अभ्यासाला पुरेसा वेळ मिळेल, असे उमेदवारांचे म्हणणे आहे. मात्र राज्य शासनाकडून ही पद्धत याच वर्षीपासून लागू केली जाणार आहे. त्यास उमेदवारांनी विरोध दर्शविला आहे. या परीक्षा पद्धतीची मुदत वाढविण्यात यावी, अशी मागणी गेल्या काही महिन्यांपासून करीत आहेत. मात्र याकडे शासन लक्ष देत नसल्याचे आंदोलनकर्त्या उमेदवारांचे म्हणणे आहे.
वर्णनात्मक पद्धत म्हणजे काय
एमपीएससीतर्फे आतापर्यंत राज्यसेवेची मुख्य परीक्षा बहुपर्यायी प्रश्नांच्या माध्यमातून घेण्यात येत होती. आता ती वर्णनात्मक पद्धतीने घेण्यात येणार आहे. ज्यात निबंधासारख्या उत्तरांचाही समावेश आहे. तसेच अभ्यासक्रमही यूपीएससीचा कॉपी केल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे.