पुणे -मार्केट यार्डातील भाजी विभागात शुक्रवारी (दि. 13) वर्षातील उच्चांकी आवक झाली. भोगीमुळे नागरिकांनी सकाळपासून घाऊकसह शहरातील विविध किरकोळ बाजारात खरेदीसाठी गर्दी केली होती. भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांच्या भावात घाऊक आणि किरकोळ बाजारात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाली.
भोगी उद्या (शनिवारी) आहे. भोगीसाठी गृहिणींकडून वालवर, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर, हरभरा आदी भाज्यांना मागणी असते. येथील बाजारात शुक्रवारी 125 ट्रक भाज्यांची आवक झाली. तरीही सर्व मालाची विक्री झाली. किरकोळ खरेदीदारांसह घरगुती ग्राहकांनी सकाळपासून गर्दी केली होती.
दुपारपर्यंत ही गर्दी कायम होती. महात्मा फुले मंडई, नेहरु चौक, गोविंद हलवाई चौक परिसरात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. संक्रांतीनिमित्त पूजनासाठी लागणारे साहित्य तसेच तिळगुळाला चांगली मागणी आहे. पूजा साहित्य खरेदीसाठी मंडई, शनिपार परिसरात गृहिणींनी गर्दी केली होती.