नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते पक्षातील पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. या कार्यक्रमा दरम्यान, राज ठाकरे यांनी मनसेची खिल्ली उडवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी बोलताना,”आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील ‘हे पोट्टं काय करणार? मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटा फिरवेल,असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.
पक्षाचे नियुक्तीपत्र देताना राज ठाकरे यांनी,“गेल्यावेळी मी दौऱ्यावर आलो, तेव्हा मनसेला पदाधिकारी मिळत नाही, अशा बातम्या आल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अंजन घालावं यासाठी पदाधिकाऱ्यांना आज पत्रवाटप करण्यात आले आहे. काही पत्रकार एखाद्या पक्षासाठी वाहलेले असतात. काही जणांनी इतके वर्ष पक्षांची दलाली केली असेल, तर त्यांना दुसरा पक्ष वाढत असताना त्रास होणारच आहे. मात्र, नागपूरमधील काही पत्रकार मनसेला प्रोत्साहन देत आहेत”, असे म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी,“एखाद्या पक्षाचा विजय आणि पराभव होत राहतो. आधी विदर्भ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर तो भाजपाचा बालेकिल्ला झाला. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष यातून गेला आहे. आज आमच्या शाखाध्यक्षांना बघून लोकं म्हणतील ‘हे पोट्टं काय करणार? मात्र, काही दिवसांनी हे पोट्टं तुमच्यावर वरवंटी फिरवेल”, असा इशाराही पक्षाची थट्टा करणाऱ्यांना राज ठाकरे यांनी दिला.
“जनसंघ १९५२ साली जन्माला आला. पुढे आणीबाणी लागू झाली. त्यानंतर मोरारजी देसाईंचे राज्य आले. त्यांची सत्ता गेली आणि इंदिरा पुन्हा निवडून आल्या. त्यानंतर १९८० ला जनसंघाचा भारतीय जनता पक्ष झाला. १९९६ ला अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले. मात्र, भाजपाला खऱ्या अर्थाने बहूमत हे २०१४ साली मिळाले. १९५२ ते २०१४ कितीही मतभेद असले तरी काम करण्याच्या सातत्यातून त्यांना हे यश मिळाले आहे. काँग्रेसचा संघर्षही मोठा आहे. १९६६ साली बाळासाहेबांनी सुरू केलेली शिवसेनेच्या हातात १९९५ मध्ये सत्ता आली. १९६६ ते १९९५ हा संघर्षाचा काळ होता. मात्र, आजचं राजकारण बघितलं, तर सर्वांना लगेच यश हवं आहे. पण त्यासाठी जिवाचं रान करावं लागलं, मेहनत करावी लागले”, असेही ते म्हणाले.