शिरूर येथील विद्याधाम प्रशालेचा परिसर गजबजला : आठवणींना उजाळा
शिरूर -सकाळी अकराची वेळ….विद्याधाम शाळेची घंटा वाजली… कोणी आमदार…कोणी एसीपी.. डॉक्टर.. माजी उपनगराध्यक्ष… उद्योगपती… सर्वजण एका रांगेत चिडीचूप 45 वर्षानंतर एकत्र आले. त्याच क्रीडाशिक्षक वसंतराव वंजारी सर यांच्या सावधान विश्रामच्या सूचना आल्या. राष्ट्रगीत सुरू… राष्ट्रगीत संपताच विद्यार्थ्यांची आपापल्या वर्गात वर्गात जाण्याची लगबग सुरू झाली. हा माजी विद्यार्थ्यांचा आठवणींचा मेळा 45 वर्षांनंतर शिरूर विद्याधाम प्रशालेत रंगला.
सकाळी नऊपासून शिरूर येथील विद्याधाम प्रशालेच्या आवारात विद्यार्थ्यांची लगबग सुरू होती. शाळेच्या आवारात नावनोंदणी सुरु होती. आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्पाने स्वागत करण्यात आले. प्रत्येकाला ओळखपत्र आणि 1975 एसएससी नाव छापलेली टोपी देण्यात आली. तत्कालीन शिपाई आनंद पाचर्णे यांनी घंटा वाजवली. अध्यापनास सुरुवात झाली.
पहिल्या सत्रात हजेरी घेण्यात आली. आमदार अशोक पवार हजर सर.. एसीपी बनकर हजर… ऍड. शिरीष लोळगे येस सर… उद्योजिका सुरेखा धारिवाल.. हजर… व्यापारी शिरीष बरमेचा हजर… शेतकरी नामदेव काळे हजर…, अशी हजेरीतून विद्यार्थ्यांची एकप्रकारे परेडच घेण्यात आली. 45 वर्षानंतर 79 विद्यार्थी हजर होते. 1975 मधील जुन्या आठवणीत दिवसभर विद्यार्थी रमून गेले होते. साथीला होते तेच त्यावेळचा शिक्षकवर्ग. असा सोहळा पाहून शिक्षकांबरोबर विद्यार्थीही गहिवरले. त्यानंतर विद्यार्थ्यांना विद्याधाम प्रशालेच्या ऑडिटरियलमध्ये नेण्यात आले.
सर्व विद्यार्थी आसनस्थ झाल्यानंतर शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर विशेष विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पहिले सत्र संपताच जेवणाची सुट्टीची घंटा वाजली. सर्व विद्यार्थ्यांनी सुग्रास जेवणाचा लाभ घेतला. दुपारच्या सत्रात आमदार अशोक पवार यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार अशोक पवार, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्या कमल सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
तु. म. परदेशी, घ. वा. करंदीकर, वसंतराव वंजारी, जगताप सर, दैठणकर सर, सारडा सर, जांबेकर मॅडम, नायडू मॅडम यांनी मनोगते व्यक्त केले. विद्यार्थी शिरीष लोळगे, नंदिनी जगताप, कमल सावंत, चित्रा पुरंदरे, शांता चाबुकस्वार, राजेंद्र इसवे, डॉ. सुभाष गवारी, बिजवंत शिंदे, बाळासाहेब बनकर, किशोर मुथा, वसंत झांजे, गोरख जामदार, किशोर जासुद, शिरीष बरमेचा, प्रफुल्ल सूर्यवंशी, पोपट ओस्तवाल, सतीश संघवी यांनी मनोगते व्यक्त केले.
माजी विद्यार्थ्यांकडून शाळेच्या प्रति असणारी कृतज्ञता व जिव्हाळा म्हणून शाळेला व गरजू विद्यार्थ्यांना मदत व्हावी, यासाठी निधी जमा करण्यात आला.