25 वर्षांनी दुर्गम भागातील डोंगरवाडीकरांनी पाहिला लोकप्रतिनिधी

ग्रामस्थांची भेट घेऊन आ. शेळकेंनी दिले मदतीचे आश्‍वासन

तळेगाव दाभाडे – अवघ्या काही मैलांच्या अंतरावर झपाट्याने विकसित झालेले महानगर… 2020 सालातही अजून विकासवाटा न सापडलेले मावळातील ‘डोंगरवाडी’ नामक दुर्गम गाव… मोजकीच घरे असलेल्या या गावाने गुरुवारी तब्बल 25 वर्षांनंतर ‘आमदार’ हा लोकप्रतिनिधी पाहिला!

विजेच्या सोयीशिवाय अन्य मूलभूत सोयीसुविधांची वानवा असलेल्या डोंगरवाडीकरांची गुरुवारी मावळचे आ. सुनील शेळके यांनी भेट घेऊन आस्थेने चौकशी केली आणि मदतीचे आश्‍वासन दिले. मावळ तालुक्‍यातील वडगावजवळील डोंगरवाडी या दुर्गम गावात गुरुवारी आमदार सुनील शेळके यांचा दौरा झाला. अतिशय तुरळक लोकवस्ती असलेल्या या गावात अद्याप अनेक सोयी-सुविधांची कमतरता आहे. रस्ते, पाणी, कचरा अशा अनेक समस्यांना येथील ग्रामस्थ अजूनही तोंड देत आहेत. तब्बल 25 वर्षांपूर्वी माजी राज्यमंत्री मदनलाल बाफना यांनी या गावाला भेट दिली होती.

त्यावेळी गावात विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर आता आमदार शेळकेंच्या रूपाने दुसरा लोकप्रतिनिधी डोंगरवाडीकरांच्या भेटीला आल्याचे आम्ही पाहिला, अशी प्रतिक्रिया येथील ग्रामस्थांनी दिली. यावेळी बोलताना आमदार सुनील शेळके यांनी डोंगरवाडी ग्रामस्थांशी सर्व समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. गावात लवकरात लवकर सर्व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.