काबुल – तेहरीक ए तालिबान पाकिस्तान ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानातून सक्रिय असून काही देशांचे सरकार अस्थिर करण्यासाठी अफगाणी भूमीचा वापर करत आहे, असा पाकिस्तानने केलेला आरोप अफगाणिस्तानने फेटाळला आहे. पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या आरोपांना अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अन्य दहशतवादी संघटनांप्रमाणे “टीटीपी’ ही संघटना अफगाणिस्तानच्या सरकारविरोधातही लढत आहे. अफगाणिस्तानच्या नेतृत्वाला तेहरीक ए तालिबान पाकिस्तानकडून अन्य देशांतील सरकारांना जेवढा धोका आहे, तेवढाच अफगाणिस्तानातील सरकारलाही धोका आहे, असे अफगाण परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
“टीटीपी’ अफगाणिस्तानातून सक्रिय आहे आणि भारताच्या पाठिंब्याने अन्य देशांमधील सरकार अस्थित करत आहे, असे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले होते. आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ संयुक्त राष्ट्राच्या “टीटीपी’विषयीच्या एका अहवालाचा हवालाही पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या आयेषा फारुखी यांनी दिला होता. अल कायदा आणि संबंधित दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात दीर्घकाळापासून सक्रिय असल्याचे संयुक्त राष्ट्रानेच म्हटले असल्याचेही फारुखी यांनी निदर्शनास आणून दिले होते.