पुणे– विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणातील मार्गदर्शनाबरोबरच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी “समान संधी केंद्र’ स्थापन करण्याचे निर्देश सर्व महाविद्यालयांना देण्यात आले होते. मात्र पुण्यातील अद्यापपर्यंत तब्बल 1,192 महाविद्यालयांनी ही केंद्र स्थापन केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संलग्नित जे महाविद्यालये समान संधी केंद्र स्थापन करणार नाही, त्यांची संलग्नता रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनास दिले आहेत.
नवीन शैक्षणिक धोरण आणि बदलत्या शैक्षणिक संधीमुळे प्रत्येक महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन करणे गरजेचे आहे. समाजकल्याण विभागाने जानेवारी 2022 मध्येच यासंबंधीचे निर्देश दिले होते. मात्र, अजूनही बहुतेक सर्व महाविद्यालयांनी एकही केंद्र स्थापन केले नसल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी देशमुख यांनी पुणे विद्यापीठाचे कुलसचिवांना पाठविले आहे. महाविद्यालयांनी ही केंद्र स्थापन न केल्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराचा लाभ मिळणार नाही, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे.
त्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने संलग्नित सर्व महाविद्यालयांना तातडीने ही केंद्र स्थापन करण्याचे पुन्हा एकदा सूचना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयांसह कृषी, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि तांत्रिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांनीही आजवर एकही समान संधी केंद्र स्थापन केलेले नाही.
“समान संधी केंद्र स्थापन न केल्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या निष्काळजीपणामुळे रोजगाराचे लाभ मिळत नाही. ही बाब भूषणावह नाही. जे महाविद्यालय असे केंद्र स्थापन करणार नाही, त्यांची विद्यापीठाची संलग्नता रद्द करण्याची कार्यवाही करावी.” – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी