महापालिका मोडणार प्रतिज्ञापत्र

100 टक्‍के कचऱ्यावर प्रक्रिया नाहीच


पाचशे टन कचऱ्याची समस्या कायम

पुणे – महापालिकेकडून 31 डिसेंबर 2019 पासून उरूळी देवाची येथील कचरा डेपोमध्ये टाकण्यात येणारा कचरा (ओपन डंपिंग) पूर्णपणे बंद करण्याचे प्रतिज्ञापत्र राष्ट्रीय हरीत लवाद (एनजीटी)मध्ये दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात शहरातील निर्माण होणाऱ्या 2 हजार टन कचऱ्यामधील सुमारे 1,500 टन कचऱ्यावरच प्रक्रिया करण्यासाठी पालिकेकडून प्रकल्प उभारण्यात आले आहेत तर, काही अद्यापही सुरू झालेले नसल्याने सद्यस्थितीत केवळ 1,200 ते 1,400 टनच कचऱ्यावर प्रक्रिया होत आहे. त्यामुळे उर्वरित कचरा पालिका डेपोत टाकत आहे.

परिणामी, ही मुदत संपण्यास अवघे 5 दिवस शिल्लक असून या मुदतीत “ओपन डंपिंग’ बंद करणे शक्‍य नसल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले, त्यामुळे महापालिकेने “एनजीटी’मध्ये दिलेले प्रतिज्ञापत्र खोटे ठरण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या मुदतीनंतर “एनजीटी’ची सुनावणी 11 जानेवारीला होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

उरूळी देवाची येथील कचरा डेपोविरोधात स्थानिकांनी “एनजीटी’मध्ये धाव घेतली आहे. त्याच्या सुनावणीत महापालिकेने या डेपोमधील “ओपन डंपिंग’ 100 टक्‍के बंद करणे तसेच शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर 100 टक्‍के प्रक्रिया करण्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. त्याची मुदत येत्या 31 डिसेंबरला संपत आहे. दरम्यान, या प्रतिज्ञापत्रानंतर महापालिका प्रशासनाने सुमारे 1 हजार टन क्षमतेचे नवीन प्रकल्प उभारले आहेत. तर काही प्रकल्प मान्यतेच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे अद्याप त्याच्या निविदा मंजूर झालेल्या नाहीत. परिणामी अद्यापही महापालिकेस शहरात निर्माण होणाऱ्या चारशे ते पाचशे टन कचऱ्यावर प्रक्रिया करता येत नसल्याने हा कचरा उरूळी देवाची येथील डेपोत टाकला जात आहे.

प्रतिज्ञापत्रानुसार, महापालिकेकडून गेल्या दीड वर्षांत जास्तीत जास्त प्रकल्प उभारण्यावर भर दिला असून त्यात यशही आले आहे. शेवटच्या टप्प्यात काही प्रकल्प मान्यतेसाठी असून त्याबाबत निर्णय न झाल्याने अद्याप 100 टक्‍के प्रक्रिया करणे शक्‍य झालेले नाहीत. त्यामुळे उर्वरित कचऱ्यावर 31 डिसेंबरपूर्वी तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार, योग्य तो निर्णय घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल.
– ज्ञानेश्‍वर मोळक, उपायुक्‍त, घनकचरा व्यवस्थापन विभाग

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.