पुणे – शहरातील लष्करी रक्षा-लेखा सेवा संस्था म्हणजेच डिफेन्स अकाऊंट सर्व्हिसेस(आयडीएएस) या संस्थेतर्फे लष्कर परिसरातील स्थलांतरित मजुरांची वसाहत एक महिन्यासाठी दत्तक घेण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर या वसाहतीत राहणाऱ्या 125 मजुरांना पुढील एक महिन्यासाठी संस्थेतर्फे खाद्यपदार्थ पुरवण्यात येणार आहे.
देशभरात मंगळवारी सिव्हिल सर्व्हिसेस दिवस साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधत पुण्यातील आयडीएएस संस्थेतर्फे वसाहत दत्तक घेण्यात आली तसेच याप्रसंगी खाद्यपदार्थ वाटप करण्यात आले. संस्थेचे प्रिन्सिपल कंट्रोलर मयांक शर्मा आणि डॉ. निरुपमा काजला यांच्या पुढाकाराने वसाहतीतील 125 स्थलांतरीत मजुरांना 250 खाद्यपदार्थ पाकिटांचे वाटप करण्यात आले.
कन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार आणि न्यानेश्वर प्रतिष्टान या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने हे वाटप करण्यात आले. मयांक शर्मा म्हणाले की, संपूर्ण देश करोना विरोधात लढत असताना, प्रशासकीय सेवेतील अधिकारी-कर्मचारी हे देखील या कार्यात बरोबरीने सहभागी आहेत, हे दाखवून देण्यासाठीच आम्ही हा उपक्रम हाती घेतला आहे.