पुणे (प्रतिनिधी) – टाळेबंदीत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री थांबविण्यात आल्यानंतर छुप्या पद्धतीने किराणा माल विक्री दुकानातून सिगारेटची विक्री करणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने पकडले आहे. कल्याणीनगर भागात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी आठ लाख 87 हजार रुपये किंमतीच्या सिगारेट जप्त केल्या.
या प्रकरणी नानाराम नथाराम देवासी (वय ३२,मूळ रा.देसूरी, जि.पाली,राजस्थान) याला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा, महाराष्ट्र कोविड १९ उपाययोजना २०२० चे कलम ११ तसेच, संसर्गजन्य रोग अधिनियम १८९७ कायद्याान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
कल्याणीनगर भागातील महेश सुपर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर सिगारेटचा साठा करून ठेवला असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 8 लाख ८७ हजार २५२ रूपयांच्या परदेशी बनावटीच्या सिगारेट जप्त करण्यात आल्या.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, संजय गायकवाड, हवालदार रमेश गरूड, फिरोज बागवान, पांडुरंग वांजळे, पिलाणे, साबळे, येलपल्ले आदींनी ही कारवाई केली.