‘कोरोनाच्या’ पार्श्वभूमीवर हडपसर मधील दानशूर व्यक्तींचा उपक्रम
हडपसर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हडपसर उपनगरातील विविध भागातील गरजूंना मोफत जेवण दिले जाते. गेल्या ३८ दिवसांपासून याच भागातील नगरसेवक मारुती तुपे, प्रमोद भानगिरे, योगेश ससाणे ,माजी उपमहापौर निलेश मगर, माजी नगरसेवक विजय देशमुख आदींसह बरेच लोकप्रतिनिधी , पक्षांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते हजारो गरजूंची भूक भागवतात. त्यामुळे वेळेवर भुकेलेल्यांची भूक भागविणाऱ्या या अन्नदात्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
हडपसर उपनगरात दररोज हातावर पोट असणाऱ्या लोकांची मोठी संख्या आहे. तसेच येथे शिक्षणासाठी येऊन राहिलेल्या विध्यार्थी यांचीही संख्या लक्षणीय आहे. याशिवाय मजूर अड्ड्यावर येऊन मिळेल ते काम करणारा मजुर वर्गही मोठा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या सर्वांची जेवणासाठी धावपळ किंवा गैरसोय होवू नये, ते उपाशी पोटी राहू नये यासाठी हडपसर उपनगरातील अनेक संस्था, लोकप्रतिनिधी, पक्षांचे पदाधिकारी, सामजिक कार्यकर्ते मदत करत आहेत.
नगरसेवक मारुती तुपे म्हणाले की, सुरवातीला प्रभागात औषध फवारणी करून घेतली, नंतर कार्यकर्त्यांच्या मदतीने गरजूंना त्यांच्या त्यांचा घरी जाऊन धान्य दिले.मात्र काहींना जेवण मिळाले नसल्याने ते उपाशी असल्याचे दिसून आले. त्याच दिवशीपासून आज पर्यंत म्हणजे ३८ दिवस माझे सहकारी आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने गरजूंना तयार जेवण पार्सल दिले जात आहे. दररोज दुपारी आणि संध्याकाळी हजारो गरजूंना या मोफत जेवणामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
नगरसेवक नाना भानगिरे म्हणाले, कोरोना संसर्ग प्रभागात वाढू नये यासाठी सुरुवातीपासून खबरदारी घेतली औषध फवारणी, पीपीई किटचे वाटप, घरोघरी सायनिटायझर आणि धान्य वाटप केले. दररोज दुपारी आणि रात्री होईल तितक्या लोकांच्या मोफत जेवणाची सोय केली आहे. आजवर लाखों गरजूंची भूक भागविण्यासाठी आपण आणि माझे सर्वंच सहकारी कार्यकर्ते कामी येत असल्याचे मोठे समाधान वाटते. अशाच स्वरूपाच्या भावना नगरसेवक योगेश ससाणे, निलेश मगर,विजय देशमुख यांनीही व्यक्त करत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गरजूंविषयी आपुलकी व्यक्त केली आहे.