वाघोली – दगडखाण असंघटीत कामगार विकास परिषद राष्ट्रीय अध्यक्ष एॅड. बी. एम. रेगे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारोंच्या संख्येने दगडखाण कामगारांनी पुणे महानगरपालिकेत समावेश असणाऱ्या वाघोली व जिल्हयातील ग्रामीण भागातील गायरान / शासकीय जमीनीवर पिढ्यान पिढया निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण करुन राहणाऱ्या अनुसूचित जाति/ अनुसूचित जमाती ( इतर मागासवर्गीय/ आर्थिक दृष्टया दुर्बल प्रवर्गातील कब्जेदाराच्या नावे शासन निर्णयानुसार विनाविलंब ७/१२ नोंदी घेणे व मौजे वाघोली येथील गायरान ग.नं. १४१९ वरील अनधिकृत कचरा डेपोची दोन एकर जागा दगडखाण महिला व कामगार भवनासाठी मंजुर करावी, या प्रलंबित मागणीसाठी वाघोली ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जमीन अधिकार मोर्चा काढला होता.
त्यानुसार शासन निर्णयातील तरतुदीनुसार मागणीनुसार प्रस्ताव तयार करुन सादर करावा. व यापुर्वीच दगडखाण कामगारांच्या विषयाबाबत पुणे जिल्हा परिषद व आपल्या कार्यालयाच्या स्तरावर बैठक झालेली आहे. सदर बैठकीचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल सादर करणेबाबत कळविणेत आलेले आहे. असा आदेश निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हवेली उपविभागीय अधिकाऱ्यांना काढला आहे. आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली असल्याने आंदोलनास यश आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या आंदोलनास नागरिकांचा देखील पाठींबा वाढू लागला आहे.