चेन्नई- आयपीएल २०२३ चा हंगाम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. त्यामुळे सर्वच संघांसाठी प्रत्येक सामना महत्वाचा असणार आहे. आजचा सामना चेन्नई विरुद्ध दिल्ली असा रंगणार आहे. तसेच हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे. चेन्नई सुपर किंग्सने प्रथम फलंदाजी करत दिल्लीसमोर विजयासाठी 168 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
चेन्नईची पॉवर प्लेमध्ये धीमी सुरुवात झाली. पाचव्या षटकात संघाच्या 42 धावा असताना डेवॉन कॉनव्हे बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायकवाड 24 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर आलेला मोईन अली काही खास करू शकला नाही. अवघ्या 7 धावा करत तंबूत परतला. शिवम दुबे आणि अजिंक्य रहाणेनं डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण अजिंक्य रहाणेला 21 धावांवर ललित यादवने तंबूचा रस्ता दाखवला.
शिवम दुबेने काही मोठे फटके मारत संघाच्या धावांमध्ये भर घालण्याचा प्रयत्न केला. पण मिशेल मार्शने त्याला तंबूत पाठवलं. अंबाती रायडू (23, रवींद्र जडेजा (21, महेंद्रसिंह धोनी (20) धावा करून तंबूत परतले. तर दिल्लीकडून मिशेल मार्शने 3, अक्षर पटेलने 2, कुलदीप यादवने 1, खलील अहमदने 1 आणि ललित यादवने एक गडी बाद केला.