जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती
पुणे – पेरणे फाटा येथे दि.1 जानेवारी रोजी होणारा विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी केली आहे. कार्यक्रम शांततेत होण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, तसेच सोशल मीडियावर समाजविघातक संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले.
विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी यावर्षीही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना पुरवण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी स्मारकाच्या ठिकाणी जाऊन केली. तेथील ग्रामस्थांबरोबर नियोजनासंदर्भात आढावा घेतला. जिल्हाधिकारी म्हणाले, अभिवादन कार्यक्रमासाठी आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक भूमिका आहे.
आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा याबाबतचे नियोजन उत्तम पद्धतीने करण्यात येत आहे. गतवर्षी विजयस्तंभ कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. पेरणे परिसरातील जागा ठरवून त्या वाहन थांब्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अवलंब करावा. नगरकडून येणारी वाहतूक व्यवस्था वळवण्यात येणार आहे.