मुंबई – शिवसेना नेते मंत्री आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे, अशी घोषणा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली. आदित्य ठाकरे यांच्यासोबत मुंबई, महाराष्ट्र आणि देशभरातील शिवसैनीक अयोध्येत दाखल होतील. अयोध्या आणि उत्तर प्रदेशातील हिंदूंनीही आम्हाला अयोध्या भेटीचे निमंत्रण दिले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
संजय राऊत म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी झाली आहे. यावेळी आमचा दौरा राजकीय नाही. आम्ही एका श्रद्धेतून अयोध्येला जाणार आहोत. भक्तीभावाने अयोध्येला गेल्यावर प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद मिळतो. राजकीय हेतून गेल्यावर राम कधीच आशीर्वाद देत नाही, अशी अप्रत्यक्ष टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगाविला.
अयोध्येत कोण जाते, कोण नाही काहीही फरक पडत नाही. श्रीराम सर्वांचे आहेत. ते सर्वांना आशीर्वाद देतात. मात्र, कोणी राजकीय कारणाने जात असेल किंवा कोणाला तरी कमी लेखण्यासाठी जात असेल तर त्यांचा आशीर्वाद मिळत नाहीत. तिथे विरोध होतो. उद्धव ठाकरे आणि आम्ही सर्व आंदोलनात होतो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर अयोध्येत गेले होते. आता आदित्य ठाकरे जाणार आहेत. 10 जूनला आदित्य ठाकरे अयोध्येत जातील. त्यांच्यासोबत सर्व शिवसैनिक जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.