राजगुरूनगर (रामचंद्र सोनवणे) – निमगाव खंडोबा (ता. खेड) येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेनिमित्त वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी देवस्थान कडे जाणाऱ्या वाहतुकीचे नियोजन केले आहे. दर वर्षी माघ पौर्णिमेला निमगाव खंडोबा येथे 2 ते 3 लाख भाविक दर्शनासाठी येतात. करोना काळात यात्रा बंद होत्या, दोन वर्षानंतर प्रथमच ही यात्रा भरणार असल्याने जवळपास 4 ते 5 लाख भाविक येण्याची शक्यता असल्याने मंदिराकडे जाणारे मार्गावर पोलिसांकडून चोख वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.
पुणे-राजगुरूनगर मार्गाने येणाऱ्या भाविकांसाठी होलेवाडी बाजूकडून मंदिराकडे जाता येणार आहे. तर सेझ वेशीकडून पुन्हा बाहेर जाता येणार आहे. दावडी बाजूकडून निमगाव खंडोबा मंदिराकडे येता येणार आहे. मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर काही ठिकाणी एकेरी वाहतूक व्यवस्था करण्यात आली असून पोलिसांनी याबाबतचा नकाशा तयार केला आहे. तसेच ठिकठिकाणी दिशा दर्शक फलक लावण्यात आले आहेत.
निमगाव खंडोबा, खरपुडी आणि कडधे येथे माघी पौर्णिमेला खंडोबाच्या दर्शनासाठी दरवर्षी तालुक्यात जवळपास 5 लाख भाविक येत असतात. त्यामुळे राजगुरूनगर शहरात तसेच पुणे-नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी होत असते. यासाठी पुणे -नाशिक कडे जाणारी वाहतूक राजगुरूनगर बाह्य वळण रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे. निमगाव खंडोबा व कडधे येथे यात्रा बंदोबस्तासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. निमगाव व कडधे गावात बैलगाडा शर्यती बंदी नंतर प्रथमच भरणार असल्याने बैलगाडा शौकिनांची मोठी गर्दी उसळणार आहे. त्यादृष्टीने यात्रा उत्सव कमिटी व पोलिसांनी उपाययोजना केली आहे. खरपुडी, निमगाव व कडधे या ठिकाणी भाविकांना पार्किंग सुविधा ठेवून नागरिकांनी नियमांचे व वाहतूक व्यवस्थेचे पालन करण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक सतीश गुरव यांनी केले आहे