पुणे – लोन ऍपव्दारे कर्ज घेणाऱ्यांना अतिशय वाईट अनुभव येत असल्याचे चित्र समोर आले आहे. ऍपव्दारे लोन घेतल्यावर आपली सर्व वैयक्तीक माहिती कंपनीला जाते. यानंतर त्याचा काही कंपन्यांकडून गैरवापरही केला जातो. अनेकदा लोन फेडल्यानंतरही धमकावणीचे आणि बदनामीकारक फोन कॉल येत असतात. तसेच आपल्या सोशल मिडियाच्या खात्यावरील मित्र व नातेवाईकांनाही टार्गेट केले जाते. याप्रकारच्या एका लोन ऍप कंपनीने नुकताच एका तरुणाचा बळी घेतला आहे. एका लोन ऍप कंपनीच्या नावाने अश्लिल छायाचित्र व शिवीगाळ असलेला मेसेज संबंधीत तरुणाच्या मित्र व नातेवाईकांना सोशल मिडियाव्दारे पाठवण्यात आला. बदनामी झाल्याने संबंधीत तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ए.पी.प्रकाशन (22,रा.माणिकबाग, सिंहगड रस्ता) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रकाशन याचा आत्येभाऊ नाईजिल राजन मटानकोट (33,रा.औंध) यांनी asan loan company विरुध्द तक्रार दाखल केली आहे. ही घटना 26 जानेवारी रोजी घडली. प्रकाशन याच्यावर केरळ येथे अत्यंविधी केल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. प्रकाशान हा पुण्यात शिक्षणासाठी आला होता. सिंहगड रस्ता परिसरात एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याला आसाममधून एका लोन ऍप कंपनीतून कॉल आला होता. दरम्यान संबंधीत कंपनीच्या नावे सोशल मिडियावर असलेल्या खात्यातून प्रकाशन याचे अश्लिल छायाचित्र आणि शिवीगाळ असलेला मेसेज त्याच्या नातेवाइकांना पाठवण्यात आला. यामुळे बदनामी झाल्याने प्रकाशन याने गळफास घेत आत्महत्या केली.
“एका लोन कंपनीच्या नावाने प्रकाशान याच्या नातेवाईकांना त्याची बदनामी करणारे मेसेज व छायाचित्र पाठवण्यात आले होते. बदनामी झाल्याने प्रकाशान याने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे.” – प्रमोद वाघमारे (पोलीस निरीक्षक, सिंहगड पोलीस स्टेशन)
“मागील वर्षी लोन ऍप कंपनीच्या नावाने धमकी तसेच बदनामिकारक मजकूर व्हायरल केल्याप्रकरणी काही गुन्हे दाखल करण्यात आले होते. यंदाही अशा तक्रारी आल्या असून त्या संबधीत पोलिस ठाण्यात पाठविण्यात आल्या आहेत. या कंपन्या बेकायदा पध्दतीने लोन देत आहेत. त्यांना ऍपबेस लोन देण्याचा कोणताच अधिकार नाही. तुम्ही लोनसाठी ऍप्लाय केल्यावर अर्ज भरताना कंपनीला सर्व परवानग्या देऊन टाकता. यामुळे कंपनीला तुमच्या सर्व सोशल मिडिया व इतर ऑन लाईन असलेल्या माहितीचा ऍक्सेस मिळत असतो. याचाच नंतर गैरवापर करुन त्रास दिला जातो” – डी.एस. हाके (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस स्टेशन)