पिंपरी, दि. 25 (प्रतिनिधी) -राज्य सरकार कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बंद करण्याचा विचार करत आहे. परंतु पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकाही शाळेत कमी पटसंख्या नसल्याने कोणतीच शाळा बंद होण्याची भीती नसल्याचे अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वीसपेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांवर शाळा बंद करण्याची वेळ येणार आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांवरील कारवाई तूर्तास तरी टळली आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या समाधानकारक आणि नियमानुसार आहे. त्यामुळे सध्या तरी एकाही शाळेला कारवाईला सामोरे जावे लागणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कमी पटसंख्या, शिक्षकांची संख्या कमी यामुळे राज्यभरातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा बंद करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. राज्यभरातील अशा शाळांची यादी बनवायला सुरुवात करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शिक्षण विभाग कामाला लागला आहे. 0 ते 20 पटसंख्या असलेल्या शाळांची यादी बनविण्यात येणार असून त्यांच्यावर कारवाईला वेग येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात प्राथमिकच्या 105 तर माध्यमिकच्या 18 शाळा आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या देखील समाधानकारक आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 44 हजार 089 विद्यार्थी असल्याचे अधिकारी सांगत आहेत. शाळांमधील विद्यार्थ्यांची उपस्थिती देखील समाधानकारक असून 20 पेक्षा कमी असणाऱ्या शाळा नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे शहरातील महापालिकेच्या शाळांना सध्या तरी कारवाईला सामारे जावे लागणार नसल्याचे चित्र आहे.
शहरातील महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये पटसंख्या पुरेशी आहे. कमी पटसंख्या असलेल्या एकही शाळा नाही.
– संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी. पिंपरी-चिंचवड महापालिका.