भोर – भोर तालुक्यात करोनाने कहर केला असून (दि.22) पुन्हा नवीन दोन बाधितांची रुग्णसंख्येत भर पडली आहे. यात पुणे- सातारा महामार्गावारील कापूरहोळ येथील एकाचा व भोरच्या पूर्वेकडील पांडे येथील एक अशा दोघांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
तालुक्यातील करोना बाधितांचा आतापर्यंतचा आकडा 143 वर पोहोचला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे व गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
तालुक्यात करोनामुक्त झालेल्या 83 जणांना प्रशासनाने घरी सोडले आहे. 59 करोना बाधित रुग्णांवर भोर व पुणे येथे उपचार सुरू आहेत. तालुक्यातील 510 जणांची स्वॅंब तपासणी करण्यात आली आहे. अद्याप तीन जणांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहेत.
प्रशासनाकडून कठोर उपाययोजना
भोर तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना करोनाची ही साखळी खंडीत करण्यासाठी भोरच्या प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. दि.23 ते 31 पर्यंत लॉकडाऊन वाढवला असून लोकांनी शासनाच्या निर्धारीत नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव व तहसीलदार अजित पाटील यांनी केले आहे.