सरकारचा महसूल वाढण्याची शक्यता
नवी दिल्ली – सरकारने या वर्षी जास्त कर्ज घेतले आहे. महसूल वाढण्याची शक्यता नाही. अशा परिस्थितीत ही तूट भरून काढण्यासाठी नोटा छापल्या जातील असे बोलले जात आहे. मात्र, सध्या तरी सरकारच्या विषयपत्रिकेवर हा विषय नसल्याचे आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांनी सांगितले आहे.
बजाज म्हणाले की, जीएसटी आणि प्राप्तिकराची रक्कम वाढू लागली आहे. सरकारने यावर्षी 12 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचे ठरविले आहे. कर्ज आणि महसूल याचा एकत्रित विचार केला तर ही बाब हाताबाहेर जाण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आम्ही सध्या तरी नोटा छापण्याच्या संकल्पनेवर विचार करीत नसल्याचे ते म्हणाले. केंद्र सरकारने विविध उद्योगांना पॅकेज दिले आहे. त्याचबरोबर आत्मनिर्भर धोरण सुरू केले आहे. यामुळे काही महिन्यांत अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्याची शक्यता आम्ही गृहीत धरू लागलो आहोत.
त्यामुळे वेगळा प्रयोग करण्याची गरज भासणार नाही असे सध्या तरी आमचे मत आहे. विविध विकसित आणि विकसनशील देशांमध्ये सध्या सरकारची तूट भरून काढण्यासाठी नोटा छापण्याचा प्रयोग केला जात आहे. मात्र, यामुळे महागाई वाढण्याची शक्यता असल्यामुळे आम्ही तूर्तास तरी या शक्यतेवर विचार केलेला नाही, असे ते म्हणाले.