पुणे – अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत टीका केल्यानंतर राज्यभरात याचे पडसाद उमटले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रस केतकीच्या टीकेनंतर चांगलीच आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून केतकी विरोधात पुण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या या तक्रारीवरून अभिनेत्रीसह नितीन भावे आणि निखिल भामरे-बागलाणकर याच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषेत टीका करणे केतकीला चांगलेच भोवले आहे. राष्ट्रवादीच्या तक्रारीवरून अभिनेत्रीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाय सामाजिक तेढ निर्माण होईल असे लिखाण केल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्ते आणि वकील विकास शिंदे यांच्याकडून पुणे सायबर पोलिसांकडे आणखी एक तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे केतकीच्या अडचणी वाढत जात आहे.
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याआधी केतकी चितळेवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नितीन भावे याने शरद पवार यांच्याविरोधात एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. ती पोस्ट केतकीनेही आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केली होती. तर निखिल भामरे-बागलाणकर यानेही पवार यांच्याबाबत वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर राज्यभरातून केतकीवर सर्वस्तरातून टीका केली जात आहे.