बंगळुरू – कर्नाटक पोलिसांनी अंमली पदार्थ सेवनाबद्दल बॉलीवूड अभिनेता सिद्धांत कपूर याला अटक केली. तो ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे.
बंगळुरूमधील एका आलिशान हॉटेलमध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना रविवारी रात्री मिळाली. त्याआधारे पोलिसांनी संबंधित हॉटेलवर छापा टाकला. पार्टीत सहभागी झालेल्या सुमारे 35 जणांना ताब्यात घेण्यात आले.
त्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 37 वर्षीय सिद्धांत याच्यासह 5 जणांनी अंमली पदार्थाचे सेवन केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पाचही जणांना अटक करण्यात आली. पार्टीच्या ठिकाणावरून पोलिसांनी अंमली पदार्थांचा काही साठाही जप्त केला.