मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘हास्यजत्रा’ फेम सिनेअभिनेते प्रभाकर मोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रभाकर मोरे यांची कोकण विभागीय सांस्कृतिक सेलच्या अध्यक्षपदी यावेळी नियुक्ती करण्यात आली.
पक्षाची ध्येय-धोरणे जनमानसात रूजवण्याचा प्रयत्न प्रभाकर मोरे करतील, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त करत त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, पुणे फिल्म फेस्टिवलसाठी ‘मदार’ चित्रपटाची निवड झाल्याबद्दल अजित पवार यांच्या हस्ते चित्रपटाचे निर्माते मच्छींद्र धुमाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, कला व सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश युवक उपाध्यक्ष अमोल मातेले, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.