गांधीनगर – शिष्यावर बलात्कार केल्याप्रकरणी स्वयंघोषित धर्मगुरू आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आसारामला गुजरातमधील गांधीनगर येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डीके सोनी यांनी 2013 साली दाखल झालेल्या बलात्कार प्रकरणात आसारामला 23 हजारांचा दंडही ठोठावला आहे. आणि पीडितेला 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी न्यायालयाने आसारामला या प्रकरणात दोषी ठरवले, तर आसारामच्या पत्नीसह सहा जणांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
फिर्यादीने गुजरात न्यायालयाला सांगितले की, आसाराम हा “सवयीचा गुन्हेगार” आहे, त्याला जन्मठेपेची शिक्षा व्हावी. 2013 मध्ये एका माजी महिला शिष्याने दाखल केलेल्या बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेला आसाराम बापू हा ‘सवयी गुन्हेगार’ असल्याचा दावा सरकारी वकिलांनी मंगळवारी गांधीनगर न्यायालयासमोर केला. या प्रकरणी आसारामला जन्मठेप आणि मोठा दंड ठोठावण्याची मागणी करण्यात आली होती. विशेष सरकारी वकील आर.सी. कोडेकर यांनी सांगितले की, सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी.के.सोनी यांनी शिक्षेच्या प्रमाणावरील युक्तिवाद ऐकला आणि अंतिम निर्णय दुपारी 3.30 पर्यंत राखून ठेवला होता. अखेर आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
आसाराम आणि त्यांच्या मुलावर बलात्काराचा आरोप-
2013 मध्ये सुरत येथिल दोन बहिणींनी आसाराम आणि त्याचा मुलगा नारायण साई यांच्याविरुद्ध 2001 ते 2006 दरम्यान झालेल्या बलात्काराच्या घटनांसाठी स्वतंत्र तक्रारी केल्या होत्या. ज्यामध्ये दोघांवर बलात्कार आणि बेकायदेशीर नजरकैदेत ठेवल्याचा आरोप होता. अहमदाबादच्या चांदखेडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आसारामने अहमदाबादच्या आश्रमात मोठ्या बहिणीवर बलात्कार केला, तर त्याचा मुलगा नारायण साई याने सुरतमध्ये लहान बहिणीवर बलात्कार केला. दरम्यान, न्यायालयाने आसारामला दोषी ठरवले असून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर मुलगा नारायण साईला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे.
दरम्यान, याआधी आसाराम बलात्काराच्या आणखी एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा दोषी सिद्ध झाल्याने त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.