मोदींच्या सभेला मिथुनदांची उपस्थिती?

कोलकता -पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा औपचारिक नारळ उद्या (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी येथील सभेत फोडतील. त्या सभेत ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती उपस्थित राहणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर होणाऱ्या मोदींच्या सभेकडे भाजपचा पहिला मोठा प्रचार कार्यक्रम म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे त्या सभेला भव्य स्वरूप देण्याची तयारी बंगाल भाजपने चालवली आहे. काही नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीमुळे मोदींची सभा चकित करणारी ठरेल, असे भाजपच्या सुत्रांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. मिथुनदा सभेला उपस्थित राहतील, अशा अटकळी काही दिवसांपासून सुरू आहेत. तृणमूल कॉंग्रेसला बंगालच्या सत्तेवरून दूर करण्याचा विडा उचलणाऱ्या भाजपने मतदारांना खेचण्यासाठी अनेक फिल्मी चेहऱ्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. त्यामुळे मिथुनदा खरोखरीच सभेला उपस्थित राहणार का आणि भाजपमध्ये डेरेदाखल होणार का, याविषयीचे कुतूहल वाढले आहे. एकेकाळी मिथुनदा डाव्या पक्षांकडे झुकलेले मानले जात. काही वर्षांपूर्वी त्यांना तृणमूलने राज्यसभेवरही पाठवले. मात्र, राजकारणातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त करत त्यांनी कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.