यावर्षीही “दै. प्रभात’चा “ग्रीन गणेशा’ उपक्रम अत्यंत आनंददायी- पुनीत बालन

पुणे – दै. प्रभात, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळ ट्रस्ट, आणि पुणे पोलीस एकत्र येऊन यावर्षीही “ग्रीन गणेश’हा उप्रक्रम राबवण्यात येणार आहे. शाडू मातीचे गणपती बनवण्याचे ऑनलाइन प्रशिक्षण शालेय विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. त्यासाठी “दै. प्रभात’ने पुढाकार घेतला आहे.

साडेसात हजार विद्यार्थ्यांपर्यंत शाडू मातीचा गोळा आणि अन्य साहित्य बॉक्‍समधून शाळेच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण ऑनलाइन देण्यात येणार आहे. या माध्यमातून बनवलेल्या मूर्तींची भाविकांनी प्रतिष्ठापना करावी.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारींनी सन 1892 मध्ये जी गणेशाची मूर्ती बनवून घेतली होती ती देखील इको फ्रेंडली होती. कागदाच्या लगदा आणि लाकडाचा भुसा यापासून ही गणेशाची मूर्ती बनवण्यात आली आहे. पुढे जाऊन भाऊ साहेबांचीही मूर्ती अशाच प्रकारे कागदी लगदा आणि लाकडाच्या भुसा वापरून बनवली आहे. या गणेशाच्या मूर्तीला 129 वर्षे झाली आहेत. आजही या दोन्ही मूर्ती आम्ही जतन करून ठेवल्या आहेत.

“ग्रीन गणेशा’ सारखे उपक्रम “दै. प्रभात’ राबवत आहे ही अत्यंत आनंददायी बाब आहे. यापुढेही आम्हांला त्यांच्याबरोबर अशा उपक्रमांमध्ये काम करायला आवडेल.

हा जो शाडू मातीची मूर्ती बनवण्याचा उपक्रम आपण राबवणार आहोत त्याचा उद्देश्‍य असा की, मुले जी शाडू मातीची गणेश मूर्ती बनवणार आहेत त्याचीच प्रतिष्ठापना केली जावी, जेणेकरून मुलांना प्रोत्साहन मिळेल. इको फ्रेंडली आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना लक्षात येईल आणि ते पीओपी वापरणे टाळतील.

यंदा गणेशोत्सव होणार आहे, परंतु साध्यापद्धतीने तो साजरा करण्यात येणार आहे. हे करत असताना धार्मिक परंपरांचेही पालन करून उत्सव होणार आहे. राज्य सरकारने जी आचारसंहिता, नियमावली दिली आहे त्याचे पालन करून हा उत्सव साजरा व्हावा. विसर्जनाबाबतही राज्यसरकारने काही गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. त्यामध्ये कोठेही विसर्जन हौद बांधण्यात येणार नाहीत. त्यामुळे प्रत्येक मंडळांनी मांडवातच गणेश मूर्तींचे विसर्जन करावे. घरगुती गणपतींचे विसर्जनही नदीत किंवा अन्य जलाशयात न करता घरातच बादलीत किंवा पिंपात करावे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.