मुंबई – देशांतर्गत प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये एक गुणवान खेळाडू म्हणून कारकीर्द गाजवलेले व नंतर पंच म्हणून कार्यरत झालेले के. एन. अनंतपद्मनाभन यांची आयसीसीच्या पंच समितीत नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये त्यांनी केरळचे प्रतिनिधित्व केले होते. आयसीसीच्या पंच समितीत समावेश झालेले भारताचे ते चौथे पंच ठरले आहेत. त्यांच्या आधी सी. शमसुद्दीन, अनिल चौधरी आणि विरेंदर शर्मा यांचा यापूर्वी पंचांच्या समितीत समावेश करण्यात आला होता. 50 वर्षीय अनंतपद्मनाभन यांनी आयपीएल तसेच अनेक स्थानिक स्पर्धांमध्ये पंच म्हणून भूमिका बजावली आहे.
“या क्षणाची मी आतुरतेने वाट पाहात होतो. भारताकडून खेळण्याची संधी मला लाभली नाही. परंतु आता पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी उत्सुक आहे. खूप वर्षांपासून पाहत असलेले माझे स्वप्न पूर्ण झाले,’ अशा शब्दांत अनंतपद्मनाभन यांनी आपल्या नियुक्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली.