सातारा – यापुढील सर्व निवडणुकीत फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या झेंड्याखाली काम करत आगामी विधानसभा निवडणुकीत प्रभाकर देशमुख यांना आमदार बनवून माणमध्ये नवा बदल घडवण्याचा निर्धार माण- खटाव राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त म्हसवड येथे झालेल्या अभिष्टचिंतन कार्यक्रमात व्यक्त केला.
यावेळी देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी मतदारसंघातून जनसागर जमला होता. श्री. देशमुख यांच्यावर टीका करणाऱ्या विरोधकांचा कार्यकर्त्यांनी खरपूस समाचार घेतला. सत्काराला उत्तर देताना प्रभाकर देशमुख म्हणाले, “”आपल्या शुभेच्छा, प्रेम माझ्यासाठी ऊर्जा देणारे असून ही ऊर्जा शेवटपर्यंत माणच्या भल्यासाठीच वापरेन. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर आपली राजकीय वाटचाल सुरु आहे. माझ्यावर बोलणाऱ्या सर्व विरोधकांचा हिशोब ठेवला असून योग्य वेळी मी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देईन. यापुढील प्रत्येक निवडणुकीत आपण सर्वांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पाठीशी ठाम राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रभाकर देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभयसिंह जगताप, माजी नगराध्यक्ष विलासराव माने, सुभाष नरळे, ऍड. पृथ्वीराज राजेमाने, किशोर सोनवणे, श्रीराम पाटील, दिलीप तुपे, ऍड. राजू भोसले आदींनी मनोगत व्यक्त करताना श्री. देशमुख माण- खटावच्या सामान्य जनतेच्या मनातील आमदार असून आगामी विधानसभा निवडणुकीत देशमुख यांना आमदार म्हणून निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करण्याचा निर्धार केला. आकाश माने यांनी प्रास्ताविक केले. इंद्रायणी जवळ यांनी सूत्रसंचालन केले. सामान्य जनतेने श्री. देशमुख यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. जयराज राजेमाने, परेश व्होरा, चंद्रकांत केवटे, राजेंद्र कोले, सचिन लोखंडे यांनी वाढदिनाच्या कार्यक्रमाचे नेटके नियोजन केले होते. दरम्यान, प्रभाकर देशमुख यांनी वाढदिवसानिमित्त शंभू महादेवाला अभिषेक घालून दिवसाची सुरुवात केली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे चिरंजीव मयुराज देशमुख होते. कातरखटाव येथे मुलींना सायकल वाटप तर तुपेवाडी येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.