लखनऊ : सामाजिक कार्यकर्त्या सदफ जाफर, माजी आयपीस अधिकारी दारापुरी यांच्यासह 13 जणांना लखनऊ जिल्हा सत्र न्यायलयाने जामीन मंजू केला.
लखनऊमध्ये झालेल्या निदर्शनात सहभागी झाल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती. यापुर्वी 23 डिसेंबर रोजी त्यांच्यावरील गुन्ह्यांचे गंभीर स्वरूप पाहता जामीन नकारण्यात आला होता. मात्र शनिवारी त्यांना न्या. एस. एस. पांडे यांनी जामीन मंजूर केला. 50 हजार रूपयांचे दोन जामीनदार आणि तेवढ्याच रकमेची व्यक्तीगत हमी यावर त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले. शुक्रवारी जामीन अर्जावरील निकाल न्यायलयाने राखून ठेवला होता.
सरकारी वकील दीपक यादव यांनी दिलेल्या माहितीवरून, जरतगंज पोलिसांनी त्यांच्यावर दंगल (147), खुनाचा प्रयत्न (307), सरकारी कर्मचाऱ्याला कामकाजापसून रोखणे (332) सरकारी कर्मचाऱ्याला सेवेत असताना मारहाण (353), गुन्हेगारी कट रचणे (120ब) या आरोपांखाली अटक करण्यात आली होती.
सुधारीत नागरीकत्व कायद्याच्या (का) विरोधातील निदर्शनातील सहभागाबद्दल अटक केलेल्या सामाजिक कार्यकर्त्या सदफ जाफर यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी न्यायलायात गुरूवारी कबूल केले होते.
अलाहाबाद उच्च न्यायलयाने योगी आदित्यनाथ सरकारला जाफर यांच्या अटकेबद्दल नोटीस बजावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांना याची उपरती झाली. जाफर यांचा हिंसाचारात सहभाग असल्याचा कोणता पुरावा तुमच्याकडे आहे, असे न्यायलयाने पोलिसांना थेट विचारले. त्यावेळी तपास अधिकाऱ्यांनी हे उत्तर दिले. या जाफर यांच्या जामीन अर्जावर शनिवारीही सुनावणी होणार आहे.
माजी अभिनेत्री असणाऱ्या आणि दोन मुलांची एकल माता असणाऱ्या जाफर यांच्यावर वेगवेगळे 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लखनऊमध्ये का कायद्याविरोधात सुरू झालेल्या निदर्शना दरम्यान पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांना पोलिस अटक करत असतानाचे फेसबुक लाईव्ह करत असताना त्यांना 19 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली.
निदर्शने करण्यावर प्रतिबंध घालणारे कोणतेही आदेश जिल्हा प्रशासनाने दिले नव्हते. त्यामुळे जाफर यांनी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नाही. त्यावर जाफर यांच्या विरोधात कोणते पुरावे आहेत, ते सादर करा, असे न्यायालयाने पोलिसांना सांगितले. त्यावेळी त्यांच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याचे पोलिसांनी सांगितले, असे जाफर यांच्या वकील हरज्योतसिंग यांनी यांनी सांगितले.
चित्रपट निर्मात्या मिरा नायर, प्रख्यात दिग्दर्शक महेश भट्ट यांनीही जाफर यांच्या सुटकेची मागणी केली होती.