नवी दिल्ली – देशात कोविडच्या सक्रिय रुग्णांची संख्या सलग तेराव्या दिवशी दहा लाखांपेक्षा कमी राहिल्याचे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. आज देशात कोविड संसर्ग झालेले 9 लाख 37 हजार 625 सक्रिय रुग्ण आहेत.
ही संख्या कालच्या सक्रिय रुग्णांपेक्षा 7 हजार 371 ने कमी असल्याचे, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीत नमूद आहे.
कोविड चाचण्यांचे प्रमाणही वाढवण्यात आले असून, गेल्या दहा दिवसांपासून दररोज सरासरी साडेअकरा लाख नमुन्यांची कोविड तपासणी केली जात असल्याचे याबाबतच्या वृत्तात सांगण्यात आले आहे.
देशातली बाधितांची एकूण संख्या 65 लाख 49 हजारांहून अधिक झाली आहे. यापैकी 55 लाख 9 हजारांहून अधिक रुग्ण आतापर्यंत या संसर्गातून बरे झाले आहेत. त्यामुळे देशातले कोविड संसर्ग मुक्तीचे प्रमाण 84 पूर्णांक 13 शतांश टक्के एवढे झाले आहे.
या संसर्गाने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या एक लाख एक हजार 782 झाला आहे. मात्र, संसर्गातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने मृत्यूदर आता एक पूर्णांक 55 शतांश टक्के एवढा कमी झाला आहे.