ढाका – अफवा पसरवणाऱ्या आणि समाजिक अस्थैर्य निर्माण करणाऱ्या वेबसाइटविरोधात बांगलादेशामध्ये लवकरच कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली जाणार आहे. गुरुवारी माहितीमंत्री डॉ. हसन महमूद यांनी ढाका इथे एका कार्यक्रमामध्ये बोलताना ही माहिती दिली.
2009 मध्ये अशी ऑनलाइन मीडिया पोर्टल खूप कमी होती पण आता अशा बऱ्याच वेबसाइट्स आहेत. न्यूज पोर्टलसाठी ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता आहे. ज्या वेबसाइट बातम्या देत नाहीत पण वैयक्तिक हितासाठी वापरल्या जात आहेत अशा वेबसाइटवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
काही निवडक पत्रकारांच्या गैरवृत्तीमुळे संपूर्ण पत्रकारिताच बदनाम होत आहे. या गैरवृत्तींच्या विरोधात पत्रकारांनीच सक्रिय होण्याची गरज आहे, असे आवाहनही महमूद यांनी केले. पत्रकारांना प्रशिक्षण देण्याचे त्यांनी सरकारी संघटनेसह पत्रकार संघटनांना आवाहन केले.
बांगलादेश सरकारने न्यूज पोर्टलच्या नोंदणीला गेल्या वर्षी डिसेंबरपासून सुरुवात केली आहे. ऑगस्टपर्यंत 3500 हून अधिक न्यूज पोर्टलने सरकारकडे नोंदणीसाठी अर्ज केले होते.