चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेमुळे हसन मुश्रीफ संतपाले, म्हणाले…

कोल्हापूर – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जन्म राजकारणासाठी नव्हे तर हिमालयात जाण्यासाठी झालेला आहे, अशी खोचक टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेला हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दोन दिवसांपूर्वी कोल्हापूरात आयोजित पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत यांचा जन्म राजकारणासाठी झाला नसल्याचे म्हटले होते. गेल्या अनेक वर्षांपासून ठाकरे घरातील कोणीही निवडणूक लढवली नव्हती. बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा कधीच निवडणूक लढवली नाही. त्यांनी पक्षवाढीसाठी नेहमी प्रयत्न केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा जन्म पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी झाला आहे, सरकार चालविण्यासाठी झाला नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावर मुश्रीफ यांनी आज आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडून वारंवार महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्याचे काम सुरू आहे. त्यातून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत आहे. त्यांच्या टीकेमुळेच आम्ही तिन्ही पक्ष एकमेकांना घट्ट आहोत. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो, असा टोला देखील मंत्री मुश्रीफ यांनी लगावला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.