नगर – जिल्हा क्रीडा संकुल वाडिया पार्क, नगर येथे दिनांक 3 ते 7 जानेवारी या दरम्यान 65 वी राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक कर्नाटक आणि तृतीय क्रमांक डी.ए.व्ही (दिल्ली) यांनी पटकाविला.
क्रीडा व युवक संचालनालय, पुणे, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने 65 व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धांचे बक्षिस वितरण समारंभ आयोजीत करण्यात आला होता. यावेळी नगर शहराचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके, महानगरपालिकेचे महापौर बाबासाहेब वाकळे, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी आर्थिक चांडक, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य मंजुषा राणा, ज्येष्ठ बॅडमिंटन खेळाडू कैन्हया गांधी, जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे, सुनंदा राजेंद्र पवार व प्रियंका मिटके आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन वैयक्तिक खेळात मुलांमध्ये एन.पी उदित (केरळ), शौर्य सिग (दिल्ली),रोहन थुल (महाराष्ट्र), मुलीमध्ये लिखिता श्रीवास्तव (दिल्ली), रुद्रा राणी (महाराष्ट्र) व दुर्गा गुप्ता (दिल्ली) तर मुलांमध्ये उदित एम.पी (केरळ) मुलीमध्ये लिखिता श्रीवास्तव तसेच ऑल राऊंडर खेळाडू रोहन थुल (महाराष्ट्र) हे उत्कृष्ट खेळाडू म्हणून ठरले.
राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजनासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व छत्रपती इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या स्पर्धेमध्ये सहा दिवस देशभरातील महाराष्ट्र ,कर्नाटक, तमिळ नाडू, बिहार, हरियाना, डीएव्ही, मध्यप्रदेश, गुजरात, तेलंगणा, राजस्थान, झारखंड, पंजाब, केरळ, पश्चिम बंगाल,हिमाचल प्रदेश, विद्याभारती, पॉडिचरी ,केव्हीएस, छत्तीसगड, दादरा आणि नगर हवेली, आसाम, ओरीसा, चंदीगड, दमण व दीव,गोवा व सीएससीई असे विविध राज्यातून 34 संघ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.