- अवैध धंद्यांबाबत पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे स्पष्ट संकेत
पिंपरी – सर्व पोलीस निरीक्षकांना अवैध धंदे बंद करण्याबाबत स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. तरीदेखील काही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू आहेत. त्या पोलीस निरीक्षकांचा पापाचा घडा भरल्यावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे.
“पोलीस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली’ या शीर्षकाखाली दै. प्रभातमध्ये 14 ऑक्टोबर रोजी वृत्त प्रसिद्ध झाले होते. पोलीस आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले. मात्र पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतरही विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु असल्याचे दिसून आले.
पोलीस आयुक्तांनी स्थापन केलेल्या सामाजिक सुरक्षा पथकाकडून गेल्या 17 दिवसात नऊ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दहा ठिकाणी छापा घातला. यामुळे अवैध धंदे खुलेआम सुरू असल्याचे उघडकीस आले. ज्या अवैध धंद्यांवर सामाजिक सुरक्षा पथक कारवाई करीत असेल तर हे धंदे स्थानिक पोलिसांना का दिसत नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
वर्षाखेरीस उघड होईल स्थिती
या अवैध धंद्याबाबत पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांना विचारले असता ते म्हणाले, अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तसेच ते बंद करण्यासाठी पोलीस निरीक्षकांना आम्ही संधी दिली आहे. वर्षाच्या अखेरीस आमच्या विभागातील अवैध धंदे बंद असल्याचे प्रमाणपत्र पोलीस निरीक्षक सादर करतात. जर त्यांनी तसेच प्रमाणपत्र सादर केले तर ते खोटी माहिती देत असल्याचे निष्पन्न होईल. कारण सामाजिक सुरक्षा पथक केलेल्या कारवाईचे गुन्हे त्यांच्याच पोलीस ठाण्यात दाखल करीत आहेत. जर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याचे उघडकीस आले तर त्या पोलीस निरीक्षकाची आपल्या हद्दीत वचक नाही, असे समजले जाईल.