पाचगणी- महाराष्ट्राचे नंदनवन महाबळेश्वर येथील वेण्णा लेक बोटिंग क्लबमध्ये पर्यटकांना आजपासून बोटिंग सुरु करण्यात आले आहे.
करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आठ महिन्यानंतर परवानगी मिळाल्यामुळे नौकाविहार सुरु झाला. सुरक्षिततेच्या सर्व खबरदारी घेत वेण्णा लेकमध्ये बोटिंग सुरु करण्यात आले आहे . ‘अनलाॅक बिगिन’ सुरु झाल्यापासुन महाबळेश्वरकडे पर्यटकांची वर्दळ वाढू लागली आहे.
निसर्गाचे विलोभनीय स्वप्न म्हणजे महाबळेश्वर .निसर्गाचा मनमुराद आनंद पर्यटक लुटू लागले आहेत. गेल्या आठ महिन्यांपासून लाॅकडाऊनमुळे अर्थचक्र थांबले असताना आता पर्यटनस्थळे हळूहळू सुरु करण्यात येत असल्याने पर्यटनाला चालना मिळणार आहे. तसेच विविध व्यवसाय करणाऱ्या स्थानिकांची उपासमार थांबण्यासाठी मदत होणार आहे.