सोरतापवाडी -सोरतापवाडी येथील दोन रेशनिंग दुकानदारांविरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यात तथ्य आढळल्यास कारवाई होणार असल्याचे हवेलीचे नायब तहसीलदार संजय भोसले यांनी सांगितले.
सोरतापवाडी येथील रेशन दुकानदारांविरोधात तक्रारी आल्या असून हवेली तालुका महसूल विभागाच्या वतीने शिधापत्रिका धारकांच्या जागेवर जाऊन लेखी स्वरूपात तक्रारी नोंद करून घेतल्या आहेत. नायब तहसीलदार भोसले, तालुका पुरवठा शाखेतील अधिकारी यांच्या समक्ष रेशन दुकानदारांविरोधात एकूण 88 तक्रारी प्राप्त झाल्या असून, तक्रारींची पडताळणी करून तक्रारींत तथ्य असल्यास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी अहवाल पाठविण्यात येणार आहे.
शिधापत्रिकाधारकांना वर्षोनुवर्षे धान्य न मिळणे, प्रतियुनिट अथवा प्रतिव्यक्ती शासनाने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार धान्य न मिळणे, अंत्योदय, अन्नसुरक्षा तसेच केशरी कार्डधारकांना धान्य न मिळणे, ऑनलाईन वितरण झालेल्या मासिक तक्त्यात तफावत, नवीन यादीत नाव नोंदणीसाठी आगाऊ रक्कम घेणे, आदी तक्रारी तहसीलदार, पुरवठा विभागाकडे धनंजय चौधरी व माऊली लाड यांनी केल्या होत्या. याची दखल घेत संजय भोसले, अव्वल कारकून एस. एस. उचाळे, बालाजी चिदरवार, राजकुमार लांडगे, तलाठी राम कारंडे यांनी तक्रारदार ग्रामस्थांच्या समक्ष लेखी जबाब नोंदवून घेतले आहेत. दोन महिन्यांतील नोंदीप्रमाणे धान्य वाटप झाले की नाही? याबाबत खात्री करून घेतली आहे.
शासनाने गरीब व अल्प उत्पन्न असलेल्या नागरिकांना माफक दरात रेशन धान्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यांच्याकडे शिधापत्रिका असताना तसेच लाभार्थी ठरत असताना अनेक वर्षे त्यांना कार्डवरील धान्य मिळत नाही. याउलट या नागरिकांचे धान्य ऑनलाइन प्रक्रियेत वितरीत झाल्याचे निदर्शनास येत आहे. बायोमेट्रिक प्रक्रियेत फेरफार करून अथवा अन्य मार्गाने शिधापत्रिका धारकांच्या धान्यात हेराफेरी होत आहे. पुरवठा विभागाने संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
-माऊली लाड, स्थानिक नागरिक