मायकल होल्डिंगची आयसीसीवर टीका
मुंबई – करोनानंतर क्रिकेट व त्याचे नियम बदलणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच चेंडूची चमक टीकून राहण्यासाठी खेळाडू आपल्या लाळेचा वापर करत होते. मात्र, आता करोनामुळे त्यावर बंदी लागली जाणार असून पॉलिशचा वापर करण्याला परवानगी दिली जाणार आहे. अर्थात हा अनाकलनीय निर्णय असल्याचे वेस्ट इंडिजचे महान वेगवान गोलंदाज व माजी कसोटीपटू मायकल होल्डिंग यांनी आयसीसीवर टीका केली आहे.
क्रिकेटच्या सुरुवातीपासूनच खेळाडू चेंडूची चमक कायम राहावी यासाठी लाळ तसेच घामाचा वापर करत आहेत. आता करोनामुळे या गोष्टी करण्याला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून आयसीसी एक पॉलिश सुचवत आहे. चेंडूच्या एका बाजूला लाळ किंवा घाम लावला तर त्याची चमक बराच काळ टीकून राहते. चेंडू स्विंगही जास्त होतो. पॉलिश लावले गेले तर चेंडू गुळगुळीत होईल व परिणामी ग्रीप करणे गोलंदाजांना कठीण जाईल. लाळेचा आणि घामाचा वापर हा नैसर्गिक आहे, पॉलिशचा कृत्रीमपणा गोलंदाजांना मारक ठरेल, असे मत होल्डिंग यांनी व्यक्त केले.
चेंडू बनवणारी प्रसिद्ध कुकाबुरा कंपनीने पॉलिश लावले तरीही चेंडूची एक बाजू चमकदार राहील असे चेंडू बनविण्याला प्रारंभ केला आहे. कदाचित या कृत्रीम पॉलिशचा वापर करण्याची सवय खेळाडूंना होईल, पण जे नैसर्गिक असते तेच चांगले असते. खेळाडू पॉलिशचा वापर करायला सरावतील मात्र, जर पॉलिश लावूनही चेंडू ग्रीप करता आला नाही व स्विंगच झाला नाही तर खेळातील सगळी मजाच निघून जाईल, असा धोकाही त्यांनी व्यक्त केला.
पॉलिश मुळात कसे असेल. त्याचा ओशटपणा गोलंदाजांच्या बोटांना लागला तर प्रत्यक्ष गोलंदाजी करताना रिलीज व्यवस्थित होणार का, चेंडूवर लावलेले पॉलिश कीती काळ राहिल. वेगवान गोलंदाजांपेक्षा फिरकी गोलंदाजांना त्याचा कीती उपयोग होईल असे काही प्रश्न मला गेल्या काही दिवसांपासून सतावत आहेत. जिथे चेंडू जास्त स्विंग होतो त्या देशात या पॉलिशचा वापर यशस्वी होईल का, अशी विचारणाही होल्डिंग यांनी केली आहे.
करोनामुळे पुढील काळात सर्वांच्या आरोग्याची काळजी म्हणून लाळ किंवा घाम वापरण्यावर बंदी येणार आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा करण्याचे निश्चित केले असून ते तिथे स्पर्धेपूर्वी 14 दिवस विलगीकरण कक्षातही राहणार आहेत. जर करोनापासून सर्व खेळाडू सुरक्षित होणार असतील तर मग लाळ आणि घामाचा वापर करताना घाबरता कशासाठी, असा सवालही त्यांनी केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी काळजी जरूर घ्यावी. मात्र, विनाकारण भीती का बाळगता, असेही त्यांनी विचारले आहे.
एकेकाळचा गुन्हा, आत्ताचा पर्याय…
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या काही खेळाडूंनी चेंडूला स्नो तसेच व्हॅसलिन लावल्याचे प्रकार समोर आले होते. त्यावेळी आयसीसीने या खेळाडूंवर कारवाई केली होती. चेंडूची चमक कायम राहावी यासाठी असे पदार्थ लावण्यासाठी तेव्हापासून बंदी करण्यात आली होती. आता मात्र, खुद्द आयसीसीच पॉलिशचा वापर करा असे आवाहन करत आहे हे हास्यास्पद नव्हे का? म्हणजेच जो प्रकार एकेकाळी गुन्हा समजला जात होता आता तोच पर्याय ठरत आहे, असे विधानही होल्डिंग यांनी केले आहे.