पिंपरी, (प्रतिनिधी) – मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघा अंतर्गत भोसरी विधानसभेच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिका क क्षेत्रीय कार्यालयाच्या पथकामार्फत मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत मंगळवारी (दि.2) चिखली येथील मजूरअड्डा परिसरात मतदान करण्याविषयी जनजागृती करण्यात आली.
मोठ्या प्रमाणावर मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे,असे अवाहन कामगारांना करण्यात आले. तसेच उपस्थित शेकडो कामगारांनी मतदानाची शपथ घेतली.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे व सहाय्यक आरोग्य अधिकारी तानाजी दाते यांचे मार्गदर्शनाखाली व 207 भोसरी मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी रेवणनाथ लबडे यांच्या नेतृत्वात स्वीप उपक्रमा अंतर्गत मजूर अड्डा परिसरात मतदार जागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व कामगार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीपमार्फत मतदान जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. यअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.