मंचर – घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे ऑनलाइन बेकायदा जुगार खेळणाऱ्या 14 जणांच्या विरोधात घोडेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच 25 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली. त्यांच्या विरोधात पोलीस जवान धोंडु अनाजी मुठे यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घोडेगावच्या हद्दीत आशिष उर्फ बबलु उत्तम कसबे (रा. घोडेगाव) हा इसम जितेंद्र उर्फ पिंटु शेवाळे (रा. लांडेवाडी) यांच्या सांगण्यावरून मटका खेळणारे इसम राजेंद्र महादेव अभंग, कृष्णा गोविंद अभंग (रा. गिरवली), संजय छबु पारधी (रा. ठाकरवाडी चास) या इसमांचे टाईम बाजार, कल्याण,
मुंबई या मटक्याचे आकडे समक्ष घेताना तसेच व्हॉट्सऍपद्वारे व फोनद्वारे मटका खेळणारे आबिद अन्सारी, बंडू (पुर्ण नाव, पत्ता माहीत नाही), विठ्ठल राऊत, शेवाळे (रा. लांडेवाडी – पूर्ण नाव, पत्ता माहीत नाही), सुनील डगळे (रा. कोळवाडी), स्वप्निल काळे (रा. घोडेगाव), किरण बीडकर (रा. शिंदेवाडी),धनंजय काळे (रा. परांडा, घोडेगाव),
ठकसेन कोकणे (रा. सुपेधर महाळुंगे), एक वेल्डिंग काम करणारा (नाव, पत्ता माहीत नाही) हे पोलिसांना सापडले आहेत. या ठिकाणाहून 15 हजार 530 रुपये रोख रक्कम आणि इतर मुद्देमाल असा एकुण 25 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.