नवी दिल्ली – श्रीराम आणि राष्ट्राप्रती माझ्या नसानसांत प्रेम आहे. त्यामुळे राम आणि राष्ट्रनिष्ठेशी तडजोड होऊ शकत नाही, अशा शब्दांत अध्यात्मिक गुरू आणि माजी काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी म्हटले आहे. पक्षविरोधी विधाने केल्याने काॅंग्रेसने कृष्णम यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर आचार्य कृष्णम यांनी एका ट्विटमध्ये काँग्रेस पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे.
आचार्य कृष्णम यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसतर्फे लखनौची जागा लढवली होती पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. आचार्य कृष्णम यांनी नुकतेच रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. मात्र, या ऐतिहासिक कार्यक्रमात काॅंग्रेस पक्ष सहभागी न झाल्याबद्दल त्यांनी पक्षावर टीकाही केली.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिस्तभंगाच्या तक्रारी आणि पक्षाविरुद्ध वारंवार विधाने केल्याच्या पार्श्वभूमीवर, काँग्रेस अध्यक्षांनी प्रमोद कृष्णम यांची उत्तर प्रदेश काँग्रेस समितीमधून तत्काळ प्रभावाने सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव तातडीने मंजूर झाला आहे.
आचार्य कृष्णम यांनी अलीकडेच पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती आणि १९ फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशातील संभल येथे श्री कल्की धामच्या पायाभरणी समारंभासाठी आमंत्रित केले होते. काही काळापासून, आचार्य कृष्णम २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिर अभिषेक सोहळ्यात सहभागी न होण्यासह काँग्रेस नेतृत्वाच्या काही निर्णयांवर टीका करत होते.