कोल्हापूर – खोची (ता. हातकणंगले) येथील सहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून, तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिची निर्घृणपणे हत्या प्रकरणी न्यायालयाने निकाल दिला आहे.
न्यायालयाने आरोपी बंडा ऊर्फ प्रदीप दिलीप पोवार (वय 30, रा. खोची) या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रमुख जिल्हा व सत्रन्यायाधीश वृषाली जोशी यांनी ही शिक्षा सुनावली. या निकालाकडे पश्चिम महाराष्ट्रासह जिल्ह्याचे लक्ष लागून होते.
नात्याला कलंक लावणारी घटना असल्याने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांनी केली होती. खटल्याचा निकाल सोमवारी सुनावण्यात आला. या खटल्यात एकूण 28 साक्षीदार तपासले. या खटल्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खोची परिसरातील ग्रामस्थांनी न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी केली होती.
दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी खोची येथील सहा वर्षांच्या बालिकेचे घरातून अपहरण करून गावातच निर्जनस्थळी तिच्यावर लैगिक अत्याचार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याचा आरोप बंडा ऊउर्फ प्रदीप पोवार याच्यावर होता. न्यायालयाने आरोपी पोवारला सर्व खटल्यात दोषी ठरवले.