नगर, (प्रतिनिधी) – जामखेड तालुक्यातील भवरवाडी येथील मुकादमास गोळीमारून जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघास जेरबंद केले आहे.
अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे (वय २०, रा. पाटोदा, ता. जामखेड), कुणाल जया पवार (वय २२, रा. कान्होपात्रा नगर, ता. जामखेड) या दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला गावठी कट्टा व एक चार चाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून दोघांना पुढील तपासाकामी जामखेड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
यातील आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या विश्वनाथ मोरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याचे विरुध्द खुन, खुनाचा प्रयत्न व गंभीर दुखापत असे ५ जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
याबाबत फिर्याद आबेद बाबुलाल पठाण (वय ४०, रा. भवरवाडी, ता. जामखेड) हे लेबर मुकादम असुन त्यांचेकडील मजुर लक्ष्मण कल्याण काळे (रा. जामखेड यास अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने दिड वर्षापूर्वी मारहाण केल्याने त्याचे विरुध्द जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपी अक्षय ऊर्फ चिंग्या मोरे याने त्याचे साथीदारासह येवून फिर्यादीस शिवीगाळ करुन, जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने गोळ्या झाडल्या होत्या.
या बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तत्काळ गुन्हे शोध पथकातील तुषार धाकराव, बापुसाहेब फोलाणे, रवींद्र कर्डिले, विश्वास बेरड, विशाल दळवी, रोहित मिसाळ, बबन मखरे, देवेंद्र शेलार, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, मेघराज कोल्हे, रणजीत जाधव, प्रशांत राठोड, उमाकांत गावडे व भरत बुधवंत अशांचे पथक नेमुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत सूचना दिल्या.
पथकाने २ दिवस घटना ठिकाण व आजुबाजूचे सीसीटीव्ही फुटेजचे आधारे आरोपींची माहिती घेत विंचरणा नदीजवळ काटवनात लपुन बसलेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार नदीपात्रा जवळील काटवनात जावुन सापळा रचून जवळपास २ तास काटवनात शोध घेत आरोपीस ताब्यात घेतले.