पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- नामांकित कंपनीत मशीनची ऑर्डर मिळवून देण्याच्या आमिषाने पुण्यातील व्यावसायिकाची ३९ लाख ८३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती येथील आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी कर्नाटकातील कलबुर्गी येथे अटक केली आहे.
गणेश दामोदर पवार (४०, रा. भिगवण रस्ता, बारामती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी प्रसाद चंद्रकांत दिवाकर (५०, पौड रस्ता, कोथरूड) यांनी वारजे माळवाडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना मार्च २०२२ ते २४ नोव्हेंबर २०२३ च्या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी मेयर्स डी एस पवारचे मालक दामोदर श्रीपती पवार, गणेश दामोदर पवार (रा. दोघेही, भिगवण रस्ता, बारामती) यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रसाद दिवाकर यांचा बांधकाम व्यवसायाकरिता लागणाऱ्या मशीनरी विक्री आणि दुरुस्तीचा भागिदारीत व्यवसाय आहे. यातील आरोपी दामोदर पवार आणि गणेश पवार यांनी फिर्यादी दिवाकर यांच्याकडून रस्ता तयार करण्यासाठी लागणारा मिनी कॉम्पॅक्टर घेतला आणि त्याचे पैसे देऊन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपींनी त्यांना एका कंपनीची मिनी कॉम्पॅक्टरसाठी मोठी ऑर्डर भेटल्याचे भासवून त्या कंपनीचे बनावट सही शिक्का असलेली ऑर्डर दाखवली व मिळालेल्या ऑर्डर्सची फिस देण्याचे आश्वासन देऊन ९ लाख ८३ हजार ५०० रुपयांची फसवणूक केली.
गुन्हा दाखल झाल्यापासून गणेश पवार हा फरार होता. तो सतत जागा बदलत होता. मात्र, पोलिसांनी खबरी आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन कर्नाटकातील कलबुर्गी येथे जाऊन त्याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते तपास करत आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस सहआयुक्त भीमराव टेळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे यांच्या मार्गदर्शनखाली, सहायक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते पोलीस अंमलदार फड, गुजर, हंडाळ यांच्या पथकाने केली.