नारायणगाव -पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाने नारायणगाव पोलीस ठाणाच्या हद्दीत 3 लाख 30 हजारांचा 22 किलो गांजा, तवेरा गाडी असा 6 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करून एकाला अटक केली आहे, अशी माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे यांनी दिली.
सिद्धेष दत्तात्रय शिदे (वय 32 रा. चाकण, ता. खेड, मूळ गांव. आळेफाटा, ता. जुन्नर), असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. फिर्याद पोलीस कर्मचारी सुनील जावळे यांनी दिली आहे. (दि.23) रात्री 10.35 वाजता नारायणगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय जगताप, सुनील जावळे, अमोल शेडगे, मंगेश भगत हे गस्त घालीत होते.
मांजरवाडी फाटा एका गाडीत गांजा आहे, अशी माहिती त्यांना खबऱ्याकडून मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने मांजरवाडी फाटा येथे शिंदे हा तवेरा गाडीमध्ये 3 लाख 30 हजार किंमतीचा 22 किलो गांजा एका पुढ्यात बाळगून तिची वाहतूक करीत आहे, असे निदर्शनास आले. त्याला ताब्यात घेऊन पथकाने तवेरा गाडीसह नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस करीत आहेत.