शहरातील रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांत वाढ

बाबासाहेब गर्जे
पाथर्डी  – शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ-मोठाले खड्डे पडल्याने छोट्या-मोठ्या अपघातात वाढ झाली आहे. खड्ड्यात पावसाचे पाणी भरल्याने प्रवाशांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने अपघात होऊन शेकडो नागरिक जखमी झाले आहेत. नवरात्र उत्सवानिमित्त श्रीक्षेत्र मोहटा देवी गडावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त येणार आहेत, त्यांच्या सुरक्षिततेसाठी तरी राष्ट्रीय महामार्ग विभागाने शहरातील खड्डे बुजवावीत अशी मागणी होत आहे.

शहरातील संपूर्ण रस्त्यात गुडघाभर खड्डे पडल्याने प्रवाशांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. छोट्या चार चाकी गाड्यांचे खड्ड्याला घासून जास्त नुकसान होत असल्याने गाडीमालक रस्त्यावरच प्रशासनासह राजकीय पुढाऱ्यांना लाखोळी वाहताना दिसतात. कोरडगाव रोडला खरेदी-विक्री संघाच्या पेट्रोल पंपासमोर रामगिर बाबा टेकडीच्या बाजूने रस्त्यावर खोल खड्डे पडल्याने अक्षरशः एकेरी वाहतूक झाली आहे. यामुळे अनेकदा या परिसरात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना खड्ड्यात पाणी साचल्याने खोलीचा अंदाज येत नाही. या खड्ड्यात लहान गाड्या अडकुन अनेक अपघात झाले आहेत तर अनेक दुचाकीस्वार खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत. शहरातील स्वर्गीय वसंतराव नाईक पुतळ्यापासून पोळा मारुती मंदिरात पर्यंत जवळजवळ अशीच परिस्थिती आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाने शहरातील खड्डे तत्काळ बुजवावीत अन्यथा रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करुन आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे. कल्याण-विशाखापट्टणम क्रमांक 61 हा राष्ट्रीय महामार्ग पाथर्डी शहरातून जातो. तालुक्‍यातील करंजी ते मिडसांगवी पर्यंत सुमारे दीडशे कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या महामार्गाचे गेल्या चार वर्षापासून कासवगतीने काम सुरू होते. मात्र वेगवेगळ्या राजकीय तडजोडीत अडकलेल्या या महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षापासून पूर्णपणे बंद आहे. ठेकेदाराने महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे खोदून प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा रचून ठेवला आहे. गेल्या तीन वर्षात या मार्गावर रस्ते अपघातात सुमारे 114 लोकांना आपला जीव गमवावा लागला तर 137 लोकांना अपंगत्व आले आहे. विधानसभा निवडणूक तयारीच्या रणधुमाळीत राजकीय नेते व्यस्त असून शहरातील नागरिकांच्या गैरसोयीचे कुणालाही सोयरसुतक नाही.

अधिकाऱ्यांसह ठेकेदाराला पोलला बांधण्याचा इशारा

शहरातील खड्डे बुजवण्यासाठी अनेक दिवसांपासून आमचा पाठपुरावा सुरू आहे. अनेक आंदोलनेही केली, मात्र महामार्ग प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. रस्त्यावरील खड्ड्यात अनेकांना जीव गमवावा लागला त्यामुळे संतापाचा कडेलोट झाला आहे. रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून आम्ही आंदोलन करणार आहोत. यानंतरही महामार्ग प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास प्रसंगी कायदा हातात घेऊन महामार्गाच्या अधिकाऱ्यांसहित ठेकेदाराला खड्ड्याजवळील पोलला बांधण्याचे आंदोलन आम्ही करणार आहोत, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांनी दिला.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here