पौड (वार्ताहर) – दुषित पाण्यामुळे रावडे (ता.मुळशी) येथील ग्रामस्थांना जुलाब, उलट्यांचा त्रास झाला. उत्सवामुळे आलेल्या पाहूण्यांना, माहेरवाशींणींना त्यांच्या मुलांना या पाण्याचा त्रास झाल्याने काही काळ घबराट पसरली होती. पंचायत समितीच्या आरोग्य विभागाने गावात येवून त्रस्त लोकांना औषधे दिली असून पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
बुधवारी (दि. २४) गावची यात्रा होती. यात्रेमुळे पुण्यामुंबईत राहणारे ग्रामस्थ, इतर गावातील पाहूणेमंडळी, माहेरवाशीणी आपल्या परिवारासह उत्सवासाठी आले होते. उत्सवानिमित्त इतरवेळी बंद असलेल्या घरातील आपल्या कुटूंबासह माणसे होती. मुळशी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून रावडे गावाला पाणीपुरवठा केला जातो.
गावाकडे जाणाऱ्या पाईपलाईन काही ठिकाणी लिकेज होती. त्यामुळे बुधवारी पाईपमधून मातकट, दुर्गंधीयुक्त पाणी घरोघरी आले. ते पाणी लोकांच्या पिण्यात आले. दूषित पाणी पिल्यामुळे ग्रामस्थांना दुसऱ्या दिवशी जुलाब, उलट्या आणि तापाचा त्रास होऊ लागला, असे काही ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शुक्रवार, शनिवार या दोन दिवशीही ग्रामस्थांना याचा त्रास होत होता. प्रत्येक घरातील माणसांना हा त्रास होवू लागल्याने काही काळ भितीही पसरली. पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने शनिवारी घरोघर त्रस्त लोकांना गोळ्या औषधांचे वाटप करण्यात आले. काही लोकांना पिरंगुट, घोटवडे फाटा, लवळेफाटा येथील रूग्णालयात हलविण्यात आले.
तर काहींनी पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. या त्रासामुळे रात्री दिडच्या सुमारास एका महिलेला पौड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले, परंतू पुढील उपचारासाठी त्यांना ससूनमध्ये पाठविण्यात आले. सलग झालेल्या उलट्या, जुलाब यामुळे लोकांचा शारीरिक ताकदही कमी झाली. तथापि नळपाणीपुरवठा पाईपलाइनमध्ये तातडीने दुरूस्ती केल्यामुळे सध्या गावातील हा आजार आटोक्यात येत आहे.
कोट – जुलाब, उलट्यांचा त्रास होणाऱ्या ग्रामस्थांनी घरोघर जावून प्रतिबंधात्मक व उपचारात्मक औषधे दिली आहेत. पाण्याचे नमुनेही तपासणीसाठी घेतले आहेत. सध्या बहुतांश लोकांचा हा त्रास कमी झाला आहे. तरीदेखील कुणाला त्रास होत असेल तर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. – डॉ. वामन गेंगजे, तालुका वैद्यकीय अधिकारी, मुळशी
मुळशी प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून रावडे गावाला पाणीपुरवठा केला जातो. दूषित पाणी पिण्यास आल्याने गावातील नागरिकांना तसेच यात्रेला आलेल्या पाहून्याना पाणी पिण्याने दुसऱ्या दिवशी उलट्या जुलाब त्रास झाला होता आरोग्य विभागास कळताच आरोग्य विभागाच्या वतीने गावात औषधे गोळ्या दिल्या गेल्या आहेत त्यामुळे सध्या गावातील नागरिकांची आरोग्य परिस्थितीत नियंत्रणात आहे. – कुंडलिक हुलावळे, रावडे ,नागरिक