जळगाव – श्रावण सोमवारानिमित्त उजैन येथील भगवान शंकराचे दर्शन घेऊन परतत असताना भाविकांच्या कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास दोंडाईचा-शिंदखेडा रस्त्यावरील बाम्हणे गावाजवळ हा अपघात घडला. यात दोन दुर्दैवी मृत्यू तर सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भाविकांची कार मध्यप्रदेश उजैन येथून सुरतकडे जात होती. यावेळी शिंदखेडाकडून भाजीपाला घेऊन येणाऱ्या पिकअपची आणि भाविकांच्या कारची समोरासमोर धडक बसली. यात पिकअप चालक आणि भाविकांच्या कारमधील एकाचा मृत्यू झाला. बाम्हणे गावातील नागरिकांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढण्याचे कार्य केले. तसेच पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
धुळे, नंदुरबारला जखमींवर उपचार
अपघातात भाविकांच्या गाडीतील सर्व जखमी झाले असून तीन जणांना तातडीने धुळे येथील जिल्हा रुग्णालयात तर तीन जणांना नंदुरबार येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तर मृत झालेल्या व्यक्तिचे शव उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन साठी पाठविण्यात आले.