नाशिक – महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक 118 व्या सत्राचा दीक्षान्त संचलन समारंभ नुकताच पार पडला. या समारंभाला दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री ठाकरे यांची उपस्थिती होती. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील याला हजेरी लावली. मात्र पोलीस खात्याचे प्रमुख अर्थात गृहमंत्री अनिल देशमुख या कार्यक्रमाला गैरहजर होते.
दीक्षांत संचलनाला पोलीस महासंचालक, रजनीश शेठ, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजय कुमार, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अश्र्वती दोरजे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील आदी उपस्थित होते.
करोना संकटातही पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेत कुठलीही तडजोड केलेली नाही. पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि त्याच गतीने क्षणोक्षणी स्वरूप बदलणारी गुन्हेगारी ही महाराष्ट्र पोलीस दलासमोरची आजची मोठी आव्हाने आहेत. अशाही परिस्थितीत या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी पोलिसांनी दाखवलेले धैर्य व शौर्य हे गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित असताना पोलीस खात्याचे प्रमुख या नात्याने गृहमंत्रीच संचलनात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे या दीक्षांत संचलनाला संदर्भात गृहमंत्र्यांच्या सोशल मीडिया हँडलवर काहीही उल्लेख नाही.
सचिन वाझे प्रकरण आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं होतं. गृहमंत्री देशमुखांना राजीनामा द्यावा लागणार अशी चर्चा सुरू झाली होती. देशमुख यांचा राजीनामा टळला आहे. मात्र या अरोपांमुळे ते अडचणीत आले होते. त्यात पोलीस विभागाच्या कार्यक्रमाला त्यांची गैरहजेरी यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.