अबाऊट टर्न – वाइज्‌

हिमांशू

जो लवकर झोपतो आणि लवकर उठतो, त्याला आरोग्य, ऐश्‍वर्य आणि शहाणपण प्राप्त होतं असं सांगणारी इंग्रजी म्हण गोऱ्या साहेबांबरोबर भारतात आली. अर्थात, तत्पूर्वी भारतातले लोक खूप जागरणं करत होते आणि सकाळी उशिरापर्यंत लोळत पडत होते, असं नाही; परंतु आपल्या या चांगल्या सवयी म्हणींच्या स्वरूपात शब्दबद्ध आणि रूढ करण्यात ते कमी पडले असावेत. “करणं’ आणि “केलेलं हायलाइट करणं’ यातला फरक समजून सांगणारा मार्केटिंगचा जमाना त्यावेळी अवतरलेला नव्हता. शिवाय आम्हा भारतीयांना बाहेरून आलेल्या गोष्टी अधिक प्रिय. त्यामुळे या म्हणीचे मार्केटिंग भारतीयांनीच केले. दुसरीकडे रात्रीच्या पार्ट्याही भारतीयांना “लवकर झोपा,’ असे सांगणाऱ्या इंग्रजांनीच इकडे आणल्या. त्या आजतागायत सुरू आहेत. आता तर “नाइट लाइफ’ शब्द प्रतिष्ठित झालाय. इंग्रजांची म्हण मात्र “म्हणीपुरतीच’ उरली. म्हणायला काय जातं! व्हॉट्‌स ऍपवर सुविचार पाठवणारे लोक काय कमी आहेत? सुविचारांचे पालन मात्र पाठवणाराही करत नाही. याच व्हॉट्‌स ऍप आदी माध्यमांनी रात्री जागून काढायची आमची सवय आणि क्षमता आणखी वाढवली. दिवसभर समोर उभे राहून आपल्याशी बोलणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीकडे दुर्लक्ष करून मोबाइलमध्ये तोंड खुपसून बसलेल्यांना रात्रीही मोबाइलशिवाय झोप लागेना. दिवे बंद झाल्यानंतर घरातल्या सगळ्यांच्याच मोबाइलचे काजवे चमकू लागतात. कुणी कुणाला “लवकर झोपा’ म्हणायचं, हाच प्रश्‍न!

आता मात्र आम्ही ठरवलंय, शक्‍य तितक्‍या लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं! छे, जिममध्ये किंवा जॉगिंगला जाण्याचा बिलकूल विचार नाहीये. परंतु या सवयीमुळे आम्ही खरोखर हेल्दी, वेल्दी आणि वाइज्‌ बनू, याबद्दल आमच्या मनात तीळमात्र शंका नाही. आम्हीच नव्हे तर रात्री लवकर झोपणारे सगळेच आता खरोखर “वाइज्‌’ ठरणार आहेत. कारण रात्रीच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या विजेचे दर दिवसाच्या तुलनेत चढे ठेवण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. रात्री विजेची मागणी जास्त असते आणि ज्या गोष्टीला मागणी अधिक तिचा दर उच्च, हा अर्थशास्त्रीय नियम! अर्थात, दिवसाच्या विजेचे दर रात्रीच्या तुलनेत कमी करणार की रात्रीच्या विजेचे दर दिवसाच्या तुलनेत वाढवणार, हे मात्र सरकारने अद्याप स्पष्ट केलेले नाही. परंतु सध्याचे सरसकट दर दिवसा लागू होतील आणि रात्रीचे वाढतील, हे चाणाक्षांनी ओळखळंय. मग रात्रीची सगळी वीज “नाइट लाइफ’कडे वळेल. ज्यांना ते “लाइफ’ परवडतं त्यांना वीजही परवडेल. ज्यांना परवडणार नाही, ते लवकर झोपतील आणि “वाइज्‌’ ठरतील. पुरेशी झोप मिळाल्यामुळे “हेल्दी’ ठरतील आणि वीजबिलात बचत झाल्यामुळे “वेल्दी’ झाले नाहीत तरी किमान काटकसरी ठरतीलच! याला म्हणतात, एकाच दगडात तीन पक्षी!

घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक असे वीजग्राहकांचे प्रकार असतातच. आता दिवसाचे आणि रात्रीचे असे दोन नवे उपप्रकार पडतील. “वर्क फ्रॉम होम’वालेसुद्धा जास्तीत जास्त काम दिवसाच संपवतील. पण मोबाइलवेड्यांचं काही सांगता येत नाही. खरं तर मोबाइल चार्जिंगचे जास्त पैसे कसे आकारता येतील, याचा गांभीर्यानं विचार व्हायला हवा होता. परंतु “डाटा स्वस्त, आटा महाग’ असण्याच्या काळात असा “सुविचार’ व्हॉट्‌स ऍपवरसुद्धा येणार नाही. तेवढे “वाइज्‌’ असतातच निर्णयकर्ते!

Leave A Reply

Your email address will not be published.