हिमांशू
कुणाचं काय तर कुणाचं काय! कुणी जगण्यासाठी धडपडत असतो, तर कुणी ते जगणं अधिकाधिक सुखकर होण्यासाठी धडपडत असतो. कुणी एकेका पैशासाठी रक्त जाळत असतो, तर कुणी वाढलेला रक्तदाब कमी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असतो. कुणाला प्रत्येक माणसाकडून अपेक्षा असते, तर कुणाला लक्षावधींचा खर्च करून माणसं बांधून ठेवावी लागतात.
समाजातल्या या विरोधाभासाला आपण आर्थिक विषमता म्हणतो आणि आपल्या देशात ती खूपच वाढत चाललीये याबद्दल वेळ मिळेल तेव्हा चिंताही व्यक्त केली जाते. परंतु जगाचा एकंदर अर्थव्यवहार आणि जगानं स्वीकारलेली आर्थिक संरचना पाहिल्यास ही दरी सर्वच देशांमध्ये वाढतेय आणि वाढत राहणारंय. जोपर्यंत आपण टांग्याच्या घोड्यासारखे डोळ्यांना झापडं लावून पळत असतो, तोपर्यंत आपल्याला काही जाणवतसुद्धा नाही. परंतु कधीकधी अशी परस्परविरोधी उदाहरणं समोर येतात, की एकाच चौकटीत पाहताना संवेदनशील माणूस हादरून जातो.
पाश्चात्य देशांमध्ये सर्वकाही आबादीआबाद आहे, असं आपल्याला वाटत असतं; पण तिथंही झगडणारा झगडतच असतो आणि बड्यांच्या केवळ लग्नातच नव्हे तर लग्न मोडताना झालेला खर्चही बातमीचा विषय ठरतो. सूक्ष्म फरक एवढाच की, झगडणाऱ्याचा संघर्ष उपेक्षित राहत नाही. लंडनमधल्या अनास्तासिया नावाची तरुणी अशाच कारणामुळे अचानक प्रसिद्धीच्या झोतात आली. वयाच्या 23 व्या वर्षांपर्यंत तिने वेगवेगळ्या क्षेत्रांत 23 नोकऱ्या केल्या.
अनास्तासियाने बेकरीत काम केलं, फिटनेस ट्रेनर म्हणून काम केलं, मॉडेलिंग केलं, आइस्क्रीम विकलं… आणि अखेर स्वतःची मार्केटिंग फर्म सुरू केली. प्रत्येक ठिकाणी तिने मन लावून काम केलं आणि काम शिकण्याची वृत्ती ठेवली. त्यामुळेच विविध कामांमध्ये ती पारंगत झाली. सोळाव्या वर्षांपासून तिनं भांडी घासण्यापासून हॉटेलात वेट्रेस म्हणूनही काम केलं. विशेष म्हणजे कोणत्याही कामावरून तिला काढून टाकलं नाही. प्रत्येक ठिकाणी तिने स्वतःच राजीनामा दिला. कोणत्याही मालकाचा तिच्यावर रोष नाही. कामं करता-करता तिने इंग्लिश, रशियन, डच आणि इटालियन या चार भाषा अवगत केल्या.
अभिनय आणि मॉडेलिंगचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. कोणतंही नवीन काम करताना घाबरायचं नाही, एवढाच तिचा सिद्धान्त! एवढ्या भांडवलावर आज ती एका व्यवसायाची मालकीण झालीये. दुसरीकडे, गर्भश्रीमंतांच्या गोटात काय चाललंय पाहा! जगातले सातव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असणारे सर्गेई ब्रिन यांना त्यांच्या दुसऱ्या बायकोला घटस्फोट द्यायचाय. आणखी एक “महागडा’ घटस्फोट म्हणून तो गाजण्याची चिन्हं आहेत. 2018 मध्ये केलेलं लग्न 2022 मध्ये मोडत असताना त्यांचं वय 48 आहे. खटला लवकर निकाली लागण्यासाठी आणि गोपनीयतेसाठी पैसे मोजूनसुद्धा प्रत्येक घटनेची चर्चा होतच आहे.
सर्गेई यांनी एका खासगी न्यायाधीशाची नेमणूक केलीये आणि त्याला तासाला 73 हजारांचं मानधन दिलं जातंय म्हणे! एवढंच कशाला, या न्यायाधीशाचा मदतनीसही ताशी 23 हजार फी घेतोय. जेफ बेजोस, बिल गेट्स यांच्या घटस्फोटाच्या आणि त्याहून अधिक त्यांनी दिलेल्या पोटगीच्या रकमेच्या चर्चा जगभर झाल्या. सर्गेई यांची पत्नी आता किती कोटींची मालकीण होणार, हा चर्चेचा विषय ठरलाय. खरोखर, एकाच दुनियेत दोन दुनिया किती सुखेनैव नांदतायत!